लेडीज फर्स्ट

                        

शोभना,विजय आणि त्यांचा मुलगा रोहित, अस हे त्रिकोणी, सुखी दिसणारं कुटूंब. विजय बँकेत मॅनेजर, शोभना एका नावाजलेल्या शाळेत मुख्यापध्यापिका. शोभना म्हणजे, शिस्तप्रिय, स्पष्टवक्ती आणि कामात अतिशय sincere अशी तिची ओळख होती. रोहित तिच्याच शाळेत आठवीत शिकत होता, पण कधीही त्याला शाळेत विशेष वागणूक मिळाली नाही,  ना कुठेही शिस्तीत सवलत मिळाली. शोभना रोज गाडीने शाळेत जात असे पण रोहित बाकीच्या मुलांबरोबर व्हॅन मधेच येत असे. शाळेत बऱ्याचश्या मुलांना तर माहीत ही नव्हते की रोहित आपल्या मुख्याध्यापक मॅडम चा मुलगा आहे म्हणून. शोभना ने तिच्या कामाच्या आणि शिस्तीच्या बळावर शाळेला खूप चांगले नाव मिळवून दिले होते.

शाळेचा कामाचा ताण संभाळूनही शोभना ने घराकडे दुर्लक्ष होऊ दिले नव्हते, विशेषतः रोहित चे खाणे,पिणे, त्याचा अभ्यास, कपडे अगदी कुठेही ती कमी पडली नव्हती.

      विजय मात्र तिच्या अगदी विरुद्ध, बँकेचे काम आणि वेळ मिळाल्यास वाचन या मधेच त्याचा वेळ जात असे. घरातले काम करणे त्याला कधी जमलेच नाही. नाही म्हणायला तो कधीतरी कामात मदत करायचे ठरवायचा पण मदत होण्यापेक्षा गोंधळच  जास्त होत असे. आणि ह्यावरून मात्र त्याला  शोभना खूप बोलत असे. रागाच्या भरात कधीकधी अपमान देखील करत असे. असे झाले की मग तो गच्चीवर जाऊन एकांतात विचार करत बसत असे आणि आपण  खूप अपराधी असल्याची भावना त्याच्या मनात येत असे. रोहित मात्र असे प्रसंग पाहून खूप खिन्न होत असे.

        परवा तसाच प्रसंग घडला. घरी पाहुणे येणार म्हणून शोभनाने विजयला बँकेतून येताना आंबे आणायला  सांगितले.घरी आल्यावर शोभनाने ते आंबे पाहिले आणि खूप भडकली.'अहो तुम्हाला काही समजत का? उद्या पाहुणे येणार आणि तुम्ही एवढे कडक आंबे घेऊन आलात?  एक काम धड करता येत नाही.'

विजय म्हटला ,'अग, मागच्या वेळी मी तयार आंबे आणले तरी तू रागावली होती म्हणून आज कडक आणले.' 'अरे देवा , काय करू या माणसाचं ,अहो तेव्हा आपल्याकडे मुलं राहायला येणार होती , त्यांना पंधरा दिवस खाता यावे म्हणून कडक आंबे हवे होते . तुम्ही पुरुष ना,घरामध्ये शून्य कामाचे.  ' आणि मग शोभनाची गाडी घसरली.

' तुम्हा पुरुषांना तर काहीही करायला नको घरासाठी. घर आम्हीच आवरायचं, सगळ्यांची खाण्या पिण्याची  व्यवस्था करायची, मुलांची तर सगळी जबाबदारी स्त्री चीच.  तुमचा काय  रोल असतो सांगा बर ,मुलांच्या जन्मात आणि संगोपनात ;  "तो" एक क्षण सोडला तर?  मुलांना नऊ महिने पोटात वाढवायचं, आणि प्रसूती सारख्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जायचं . बर एवढ्यावरच सगळं थांबत नाही, जन्मानंतरही त्यांचं फीडिंग, त्यांचं सगळ आवरणं मग थोडे मोठे झाल्यावर शाळा ,अभ्यास, डबे सगळं सगळं स्त्री ने च बघायचं, पुरुष कोणती जबाबदारी घेतो सांगा? ' विजय निरुत्तर. तरी शोभनाच संपलेलं नव्हतं.

तुम्ही काय फक्त पैसे कमवून आणता, पण आता तर स्त्रिया सुद्धा काम करतात, त्यामुळे त्याचीही तुम्ही काही फुशारकी मारू शकत नाही.

आज मात्र विजय खूपच दुखावला गेला , शोभना च्या  बोलण्यात  अभिनिवेश असला तरी तथ्य देखील होते. स्वतः अगदी नाकाम असल्याची भावना त्याला येत होती.

तो आपल्या नेहमीच्या एकांताच्या जागी जाऊन बसला. तेवढ्यात रोहित खेळून आला व त्याने पाहिले, आपले बाबा एकटे गच्चीत बसले आहेत व त्याच्या लक्षात आले, काय घडले असेल ते.

असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी रोहित त्याच्या बाबांना म्हटला, ' बाबा, उद्या आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे, मी पण भाग घेतला आहे. माझी इच्छा आहे तुम्ही पण यावे. येणार ना?'  विजय ने होकार दिला. खर म्हणजे त्याची कुठल्याही समारंभात जायची इच्छा नव्हती पण रोहित च मन राखण्यासाठी त्याने जायचं ठरवलं.

    वक्तृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आणि स्पर्धेला विद्यापीठाचे कुलगुरु प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. शाळेसाठी आणि विशेषतः शोभना साठी फार महत्वाची बाब होती.

विषय होता ' मला सर्वात प्रिय व्यक्ती'

भाषणं सुरू झाली. विजय शेवटच्या रांगेत बसला होता. मुलांनी खूप तयारी केली होती.  जवळजवळ  सगळ्या मुलांची सर्वात प्रिय व्यक्ती आई च होती. खूप सुंदर भाषणं सुरू होती. बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती. जवळजवळ पाच ते सहा भाषणं झाल्यावर रोहितचा नंबर आला. त्याने मात्र स्वतःच भाषण तयार केल होते कारण शोभनाला तेच अपेक्षित होतं.

   'व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर ,माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांत प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा! मी असे का म्हणतोय ते तुम्हाला माझे बोलणे ऐकून झाल्यावर समजेलच.

बाबा मला अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात . मी आपणासमोर काही प्रसंग सांगणार आहे.

पहिली गोष्ट बाबांनी शिकवली ती म्हणजे, स्त्री चा सन्मान.पण सन्मान म्हणजे नुसती पूजा नव्हे तर सक्षम बनवणं, संधी उपलब्ध करून देणे .बाबांनी जे शिकवले ,स्वतः ही तसेच वागले.  माझी आई जेव्हा लग्न होऊन घरी आली त्यावेळेस फक्त बारावी झालेली होती. घरात अगदी पुराणमतवादी वातावरण होते, पण बाबांनी सगळ्यांशी विरोध पत्करून आईला शिकवायचे ठरवले.  तिला कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिली आणि तिला स्वतःची स्कुटर दिली व स्वतः बसने जात. ते म्हणत तुला घरातली सर्व काम करून कॉलेज ला जावे लागते खूप दमछाक होते तुझी.  आणि  अश्याप्रकारे,  आपल्या शाळेला लाभलेल्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका साकारल्या. एवढंच नाही तर तीन वर्षेपूवी बाबांना बँकेमार्फत गाडी मिळाली त्यावेळेस देखील बाबा आईला म्हटले तू गाडी वापरत जा, मी जाईन स्कुटर ने.  हे बघ तू शिक्षिका आहेस, शिक्षकांनी शाळेत कसं ऊर्जेने भरपूर जायला हवं , कारण तुम्ही शिक्षक लोक पिढ्या घडवायचं काम करता, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असणार तेवढं मुलांना चांगलं शिकायला मिळेल. 

दुसरी गोष्ट सांगतो, त्यांनी नेहमी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला शिकवले. घरी येणारा कुणीही कष्टकरी असो त्याला प्रेमाने वागवायला सांगत. कधीही छोट्या  व्यावसायिकाबरोबर पैशाची घासाघीस करू देत नसत. अगदी रस्त्यावरून जाताना एखादा लोटगाडी वाला जात असेल तर त्याला आधी जाऊ देत. ते म्हणतात आपल्याला गाडीवर जायचं असतं, पण त्याला एवढं वजन न्यायचं असत.

त्यांनी शिकवलेली अजून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे तो एक प्रसंग होता. माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी आईला, पहाटे लवकर उठवायला सांगून झोपलो होतो, पण तिने उठवले नाही आणि मग मला उशिराने जाग आल्यावर जोरात मी जोरात भोंगा पसरवला . घरात मोठाच गोंधळ निर्माण झाला, मी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, तेव्हा बाबा आले आणि मला बाजुला नेऊन म्हटले, मी काय सांगतो ते ऐक आणि मग ठरव पुढे, रडायचं की काय करायचं. हे बघ बाळा दुसरी मुलं अभ्यास करायला लागतो म्हणून रडतात पण आमचा मुलगा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून रडतो , किती भाग्यवान आहोत आम्ही. आणि दुसरं एक सांगतो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःख आणि सुख या सर्व गोष्टींना आपण स्वतः च जबाबदार असलं पाहिजे. अस असेल तरच आपल्याला त्यातून मार्ग काढायला सुचतं. दुसऱ्याला जबाबदार धरलं तर कधीही तो प्रश्न सुटत नाही. आता तूच ठरव , जे झालं त्याला कोण जबाबदार?

  बाबाचं म्हणणं ऐकून मला एकदम काहीतरी सुचलं, रडणं बिडण कुठेच गेलं . दुसऱ्या दिवसापासून मी अलार्म लावून झोपू लागलो आणि तेव्हापासून अगदी वेळेवर, कुणीही न उठवता देखील  उठतो.

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील ,पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे.

तर अशाप्रकारे बाबांनी मला बरीच अमूल्य अशी  मूल्ये शिकवली.  आईने शरीराचं संगोपन केलं तर बाबांनी संवेदनशील मन जोपासलं. आई ही हिऱ्याची खाण असेल तर बाबा त्याला पैलू पडणारे जवाहिर आहेत.

आणि म्हणून माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. माझे हिरो आहेत माझे बाबा!

सर्वाना नमस्कार, जय हिंद !'

रोहितचं भाषण संपल्यावर सगळे उभे राहिले आणि बराचवेळ टाळ्या सुरू होत्या.

बक्षीस अर्थात रोहितलाच मिळाले. बक्षीस वाटपाच्या वेळेस त्याच्या आई आणि बाबांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस वाटप होते.  शोभना ला आज आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा खूप अभिमान वाटला. विजय ला तर जणू  जगण्याची नवी उमेद मिळाली,आणि रोहित,  रोहितच्या आनंदाचे खरे कारण तर फक्त त्यालाच माहीत होते.

बक्षीस वाटपाच्या वेळी विजय सर्वात मागे उभा होता तेव्हा कुलगुरू म्हटले , विजयराव पुढे या ना तेव्हा विजय  ने म्हटलं नाही सर, लेडीज फर्स्ट!

डॉ बी डी पटेल

   शहादा

..

Write a comment ...